Technology, Innovations, Funn, Day to Day.......!!

Saturday, November 24, 2012

चिवट


एकदा एक सुतार काही मजुरांना घेऊन जंगलात फिरत होता. ते शोधत होते बांधकामासाठी काही लाकूड. चालत चालत ते एका झाडापाशी पोहोचले. समोर एक भलंमोठं झाड होतं. त्याचा बुंधा एवढा मोठा की, पाच-सहा जणांनी एकावेळी मिठी मारली तरी ते झाड कवेत येईना.

हे झाड कुठून कसं कापावं, कुणाला कळेना. पण एक तरुण मजूर म्हणाला, ‘आपण लावू सगळी ताकद पणाला, तोडूच हे झाड.’

म्हातारा अनुभवी सुतार म्हणाला, ‘असं काही नको. हे झाड फार जुनं आणि चिवट आहे. आपण पंधरा दिवस खपलो तरी काही झाड तोडता येणार नाही, त्यापेक्षा आपण पुढं जाऊ. दुसरं झाड पाहू.’
सगळे सुताराच्या मागे चालू लागले.

तेवढय़ात तो तरुण मजूर म्हणाला, ‘बघा, केवढं मोठं झाड पण काही कामाचं नाही. उपयोग शून्य त्याचा.!’

म्हातारा सुतार थांबला आणि म्हणाला, ‘तसं नाही रे बाबा, असा घाईत निष्कर्ष काढू नको. हे झाड स्वत:शी प्रामाणिक आहे म्हणून ते इतकी वर्षे झाली टिकून आहे, ते जर इतरांसारखंच असतं तर एव्हाना आपण ते सहज कापलंही असतं. पण त्यानं वय वाढलं तरी आपला चिवटपणा सोडला नाही. उलट वाढवला. म्हणून तर इतकं मोठं होऊनही ते जिवंत आहे, बिशाद नाही आपली त्याच्यावर कुर्‍हाड चालवायची. त्याचं कारण काय, तर इतरांपेक्षा ठाम उभं राहण्याची ताकद त्यानं कायम ठेवली. ती आहे म्हणून हे झाड जगतंय, नाहीतर केव्हाच मरून गेलं असतं इतरांसारखं. तेव्हा लक्षात ठेव, लोक आपल्यावर कुर्‍हाड चालवतात म्हणून दोष द्यायचा नसतो. आपण किती ठाम आणि चिवट आहोत यावर त्या कुर्‍हाडी चालतात की मोडून पडतात हे ठरत असतं.!’